समृद्ध सांस्कृतिक वारसा जपणारी गोर बंजारा होळी - डॉ. सुभाष राठोड
◆ समृद्ध सांस्कृतिक वारसा जपणारी गोर बंजारा होळी
प्रा. डॉ. सुभाष राठोड, पुणे
पुरातन काळापासून रान-माळात, डोंगर – दऱ्याखोऱ्यांत, गिरी-कंदरात वस्ती करून राहणारा, मेहनती, काटक या गुण वैशिष्ट्यांनी आपले जीवन आबादी आबाद करणारा गोर बंजारा समाज यांची ‘गोर संस्कृती’ ही जगावेगळी आहे. त्यांचे जीवनच मुळात नित्य – नैमित्तिक सण – उत्सवांनी पुरेपूर भरलेले आहे. नृत्य – संगीत हा त्यांचा स्वभाव धर्म आहे. कोणाचे मनोरंजन किंवा करमणूक करण्यासाठी त्यांचे हे सांस्कृतिक आविष्कार आविष्कृत होत नसून त्यांच्या जीवन जगण्याचाच तो एक स्थायीभाव, अविभाज्य भाग आहे. आपल्या समाजात जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक घटनेला संस्कार, विधी आहेत आणि प्रत्येक सण – समारंभ, विधी, संस्कारांच्या वेळी नृत्य, गीत – संगीत आहेच ! गोर बंजारा समाजाच्या होळीच्या उत्सवात, बंजारा समाजाच्या प्रथा, रूढी आणि, परंपरांचे सांस्कृतिक दर्शन घडते.
गोर – बंजारा समाजाचा होलिकोत्सव हा एक जणू आनंदोत्सवच ! मानवी नात्याची वीण घट्ट करणारा, प्रेम आणि आनंदाची मुक्तहस्ते उधळण करणारा सण म्हणजे होळी सण होय. शिशिर ऋतू संपत आला की, झाडावेलींना वसंत आगमणाची चाहूल लागते. झांडांची पानगळ थांबलेली असते. माळरानावर गर्द केशरी रंगाची उधळण करीत पळस फुलू लागतो. फुलांवर भ्रमर रुंजी घालू लागतात. आंब्याला मोहोर येऊ लागतो. वनराजी नव्या नवलाईने बहरू लागते. फाल्गुन उजाडता झाला की, गोर-बंजारा तांड्यावर होळीचे रंग बहरू लागतात. निसर्गाच्या प्रसन्न वातावरणात होळी हा सण येतो. मूलतःच नाच – गाण्याची आवड असलेल्या बंजारा समाजातील तांड्यावर स्त्री– पुरुषांचे पाय होळीच्या निमित्ताने थिरकू लागतात. इतर कोणताही समाज होळी या सणाचा इतका आनंद क्वचितच घेत असेल.
लोकासंस्कृतीचे दर्शन घडविणारा रंगोत्सव होळी आणि रंगपंचमी हा सण प्रत्येक समाजात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. बंजारा समाजानेही आपली होळीची आगळी-वेगळी परंपरा जपली आहे. बंजारा समाजाची होळी आणि त्यानंतर होणारा लेंगी महोत्सव ही एक सांकृतिक पर्वणीच असते. गेल्या कित्येक वर्षापासून या समाजाने होळीचे अस्सलपण, आणि परंपरा टिकवून ठेवली आहे.
◆ तांड्याच्या नायकाचे महत्त्व :
गोर-बंजारा समाजाने अनेक बाबतीत आपले खास वेगळेपण राखलेले आहे. होळी सणाच्या एक दिवस अगोदर तांड्याचा मुखिया ( प्रमुख) ‘नाईक’ यांच्या घरी तांड्याचा कारभारी, ताड्यातील प्रतिष्ठित, बुजुर्ग, जाणकार मंडळींची गणसभा बोलावून होळी सण साजरा करण्याविषयी एक बैठक संपन्न होते. दरम्यानच्या काळात तांड्यावर काही अशुभ घटना घडलेली असल्यास, तांड्यावर दु:खाचे सावट असल्यास त्यावर्षी होळी साजरी केली जात नाही. परिस्थितीचा सारासार विचार करून होळी साजरी करायची किंवा नाही याबाबत अंतिम निर्णय नाईक देतो. होळी साजरी करायची झाल्यास फाल्गुन शुक्लपक्ष पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी होळी पेटवली जाते. यावेळी होळीची देखरेख करण्याची जबाबदारी खास दोन युवकांवर सोपवली जाते, ज्यांचे त्यावर्षी लग्न होऊ घातलेले असते. यालाच बंजारा बोलीभाषेत ‘दांडो काडणू’ असे म्हणतात. अशा मुलांनी होळीसाठी लाकडे गोळा करून आणण्याची प्रथा आहे. यासाठी आपल्याच समाजातील भिन्न कुळगोत्रातील दोन उपवर बंजारा युवकांची नाईकांच्या बैठकीत निवड केली जाते. या तरुणांना ‘गेरिया’ असे म्हणतात.
◆ होळीच्या स्थानाची पूजा :
होळीची लाकडे रचण्यापूर्वी ज्या ठिकाणी होळी पेटवली जाते, तिची विधीवत पूजा केली जाते. नायक ही पूजा संपन्न करतात. होळीच्या जागी लोखंड, सुपारी, ज्वारीचे पीठ, खोबरे इत्यादींचे तुकडे ठेवून तो अगरबत्ती पेटवतो. होळी पेटविण्याच्या ठिकाणी नायक सर्वप्रथम सुरीने सात वार करतो. यानंतर तांड्यांचा कारभारी त्यांच्यावर त्याच ठिकाणी कुऱ्हाडीने पाच वार करतो. या विधीत प्रदेशपरत्वे थोडाफार फरक असू शकतो. या विधीनंतर होळीची लाकडे रचली जातात. होळी पेटविण्याच्या वेळी दोन तरुण (गेरिया) जवळपासच्या नदीवर किंवा विहिरीवर जाऊन स्नान करतात व अंगावरील उपरणे पाण्यात भिजवून ओल्या कपड्याने होळीच्या जागी येतात. होळीला सातवेळा प्रदक्षिणा घालून पेटत्या होळीवर ओल्या उपरण्याचे पाणी शिंपडावे. व होळीच्या अवती-भवती बोंबा मारतात. यावेळी पेटत्या होळीसमोर तेथे जमलेले बंजारा गण गोलाकार ‘पायीजोड’ होळी नृत्य करतात. होळी पेटविण्याची दरवर्षीची ठराविक जागा सुद्धा निश्चित केलेली असते. त्या ठिकाणी ती पेटवली जावी असा संकेतही बंजारा समाजात पाहावयास मिळतो.
◆ होळीच्या लाकडांची रचना :
रात्रभर होळी खेळल्यानंतर पहाटे चारच्या सुमारास गेरिया ( उपवर तरुण ) व ताड्यातील लहान-थोर मंडळी नायकाच्या समवेत होळीच्या ठिकाणी जाऊन होळी पेटवतात. गेरिया गोळा केलेली लाकडे उभी करून रचतात. याला बंजारा भाषेत ‘होळी रचणो’ म्हणतात. होळी जितकी वर जाईल, तितकी ती अधिक शुभ मानली जाते. होळी रचताना लाकडे खाली पडल्यास ते अशुभ मानले जाते. होळीचे लाकूड पुन्हा उभी करून रचली जात नाहीत. होळीची लाकडे पुन्हा रचणे निषिद्ध मानले जाते. होळीची लाकडे रचताना ती खाली घसरलअशुभ ते अशुभ समजून होलिकेला बोकडाचा बळी देणे आवश्यक मानले जाते. त्यामुळे होळीची लाकडे रचताना खूप काळजी घेतली जाते. तुऱ्हाट्या, लाकडे, शेणाच्या गोवऱ्या, गवत इ. विशिष्ट पद्धतीने रचून त्यात एरंडाच्या झाडाच्या फांद्या मधोमध खोचून होळी पेटवतात. होळीच्या चारी बाजूंनी स्त्री – पुरुष हर्षोल्लासाच्या साथीने लेंगीनृत्य अथवा ‘वाजणा नृत्य’ करतात. होळी नृत्यानंतर मुले नैसर्गिक पळस फुलांचा रंग खेळतात.
दांडी पुनवेपासून गुढीपाडव्यापर्यंत बंजारा समाज होळी साजरी करतो. बंजारा समाजात होळीचा सण अगदी दिवाळीसारखाच साजरा होतो, लोकगीतं हे बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचे खास आकर्षण आहे. गोर बंजारा गणात होळी सणात ’धुंड’ आणि ’गेर’ ही एक आगळीवेगळी पद्धत पहावयास मिळते. होळी खेळताना दीर – भावजयींची थट्टा – मस्करी लक्ष वेधून घेते. चेष्टेचे नाते असलेल्या बंजारा समाजातील पुरुषांना होळीच्या निमित्ताने भावजयीच्या छडीचा मार खावाच लागतो.
’दांडो काढणो’, (नायकाची संमती) ’होळी बाळणो’, ( होळी पेटवणे) ’धुंड करणो’ (मुलगा जन्मल्याचा आनंदोत्सव), ’होळी रमणो’, (होळी खेळणे), ’खिला वखडणो’, ’फाग रमणो’, (पळस फुलांचा रंग खेळणे), ’होळी धोकणो’ (होळीची पूजा) ’गेर मांगणो’ (वर्गणी गोळा करणे) असे विविध पैलू गोर – बंजारा समाजाच्या होळीचे दिसून येतात.
इतर समाजात फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला सायंकाळी होळी पेटवली जाते. मात्र बंजारा समाजाची सामुहिक होळी दुसऱ्या दिवशी शुक्राची चांदणी निघताना पहाटे-पहाटे पेटवतात. होळी हा सण इतर समाजात मुख्यत्वे तीन दिवस साजरा केला जातो. बंजारा समाजाची खरी होळी ही धुळवडीच्या दिवशी असते. पहिल्या दिवशी हिंदू प्रथेप्रमाणे सायंकाळी प्रत्येकाच्या घरी वैयक्तिक छोटी होळी पेटवली जाते. यालाच ’नानकी होळी’ असे म्हणतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे धुळवडीच्या दिवशी सकाळी बंजारा समाजाचे वस्तीस्थान असलेल्या तांड्याच्या पूर्व दिशेला सामुहिक होळी पेटवली जाते. यालाच ’मोट होळी’ असे म्हणतात. इतर समाजात फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला सायंकाळी होळी पेटवली जाते. मात्र बंजारा समाजाची सामुहिक होळी दुसऱ्या दिवशी शुक्राची चांदणी निघताना पहाटे-पहाटे पेटवतात.
राठोडेर होळी : राठोड कुळगोत्रातील गोर बंजारांची एक स्वतंत्र होळी व आढे, पवार, चव्हाण, जाधव इ. या सर्व कुलगोत्रातील लोकगणांची एक स्वतंत्र होळी, अशा दोन स्वतंत्र होळी शेजारी – शेजारी पेटवल्या जातात. यात एक मोठी असते तर दुसरी थोडी लहान असते. त्या दोघी बहिणी – बहिणी होत्या, त्यांच्यापासून लोकांना फार त्रास होत असे, या समजुतीमुळे त्या दोघी बहिणींना पेटवून देण्यात आले, अशी बंजारा समाजात आख्यायिका सांगितली जाते. होलिका दहन झाल्यावर सुरुवातीला काही आध्यात्मिक लेंगीगिते सादर केली जातात. एक गीत –
’परमेरी होळी रमो रे मुरेहारी।
राधा मारच पिचकारी रे होळी रमो मुरेहारी।
आडदांड महिमा वाळीये, होळी रमो मुरेहारी।‘
होळी हे तांड्याच्या एकतेचे प्रतीक आहे. आपापसातील सारी भांडणं, तंटे, वादविवाद, राग, लोभ विसरून सगेसोयरे, भाऊबंद, अवघ्या तांडयातील गेरिया हातात हात घालून लेंगी गीत व डफाच्या तालावर नाचू-गाऊ लागतात. गेरणीचा घोळका गोल रिंगण करून, फेर धरून डफाच्या तालावर बेधुंद होऊन नाचू गाऊ लागतात, गोर बंजारा समाजाइतका इतर समाज होळीचा आनंद क्वचितच घेत असेल ! हिंदू संस्कृतीच्या मान्यतेनुसार नववर्षारंभ पाडव्यापासून होतो, गोर बंजारा समाजाच्या सांस्कृतिक मान्यतेनुसार होळीपासून त्यांच्या नववर्षाला आरंभ होतो असे मानले जाते.
◆ लहान मुलांचा धुंड संस्कार : -
गोर बंजारा समाजात होळीच्या दिवशी होळी ते पुढच्या वर्षीच्या होळीपर्यंत जन्मलेल्या मुलांचा ‘धुंड’ नावाचा एक संस्कार विधी (स्वागत सोहळा) साजरा केला जात जातो. आजही *‘धुंड संस्कार विधी’* अनेक तांड्यावर साजरा होताना पाहायला मिळतो. विवाहित, गर्भवती महिलेला मुलगा व्हावा, यासाठी त्यांच्या घरासमोर अंगणात ’शुभचिंतनपर शृंगारिक लेंगी’ (होळीगीते) म्हणण्याची अनोखी प्रथा बंजारा समाजात दिसते. बंजारा समाजातील ‘धुंड’ संस्कार सोहळा आजच्या आधुनिक युगात मात्र नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सकाळी होळी जाळल्यानंतर तांड्यात वर्षभरात ज्याच्या घरी मुलगा जन्माला आला आहे, त्या मुलाचा ‘धुंड’ नामाचा संस्कार विधी साजरा केला जातो.
◆ दंतकथा :
सणासंबंधी होळी, धुंड संस्कारासंबंधी बंजारा समाजात अनेक दंतकथा प्रचलित आहेत. त्यापैकी एक दंतकथा – एका गावी धुंडा नावाचा एक राक्षस राहत होता. तो अतिशय क्रूर आणि दुष्ट होता. तो राक्षस लहान मुलांना उचलून नेत असे. धुंडाच्या त्रासापासून लोकांना मुक्ती हवी होती. लोकांनी त्याला होळीत ढकलून दिले. धुंडा राक्षस आगीत जळून खाक झाला. धुंडा नावाच्या राक्षसाची दंतकथा वाईटाचा नाश आणि चांगल्याचा विजय दर्शवते. ती आपल्याला शिकवते की, एकत्रितपणे आपण कोणत्याही अडचणीवर मात करू शकतो.
धुंड विधीच्या पहिल्या दिवशी नवजात शिशूचे आई – वडील आपल्या सग्या-सोयऱ्यांना आमंत्रण देतात. आपल्या पुत्रप्राप्तीच्या आनंदात त्यांना सहभागी करून घेतात. त्या मुलाच्या घरी सर्व गेरिया व गेरणी एकत्र जमून पारंपरिक गीतांसह नृत्य करतात. होळी सर्वप्रथम नायकाच्या घरी खेळली जाते. तासभर इथे होळी खेळून झाल्यावर गेरिया ज्या मुलाचा ‘धुंड’ विधी साजरा करायचा असतो त्या मुलाच्या घरी जातात. तिथे ते रात्रभर पायजोड लेंगी खेळतात. यावेळी नायक होळीच्या गेरीयांना आशीर्वाद देतो. तो गेरियांना (होळी खेळणारे) काही पैसे भेट म्हणून देतो. या प्रथेचा आविष्कार खालील लोकगीतांतून दिसून येतो :
’अन् भाई रे !
नाचते – कुदते गेरिया उतरे ।
अन गेरिया उतरे नायक दरबार ।
अन नायक दरे रपिया पचीस ।‘
बंजारा समाजाचा होलिकोत्सव म्हणजे ग्राम लोकरंगभूमीवरील एक अनोखा सांस्कृतिक अविष्कारच होय. गोर बंजारा समाजात होळी सण हा केवळ एक सण म्हणून साजरा न करता ’एक उत्सव’ म्हणून साजरा केला जातो. हा होलीकोत्सव म्हणजे विधीनाट्याचा एक सोहळाच असतो. विधी व नृत्य यांचा सुरेख संगम या सणाच्या वेळी पाहायला मिळतो. सर्व विधी एका सुत्रामध्ये गुंफलेले असतात. याच दिवशी ज्यांच्या घरी मुलगा झाला आहे, त्यांच्या घरी जाऊन त्या बाळाची ‘धुंड’ साजरी केली जाते. ‘धुंड’ म्हणजे घरी मुलगा झाल्यावर साजरा केलेला आंनदोत्सव !
देशातल्या हरेक गोर बंजारा तांड्यांवर होळी सणाला दरवर्षी ’धुंड संस्कारा’ चा नित्य नेम ठरलेला असतो. वर्षभरात तांड्यात जन्मलेल्या बाळाचे धुंड करतात. जर त्या वर्षात तांड्यात कुणाच्याही घरी मुलगा जन्मला नाही, तर अशा होळीला *’वांझ होळी’* म्हणून संबोधले जाते. धुंड संस्काराच्या वेळी अंगणात एक ‘खिला’ (मेख) गाडल्या जातो. तो *’खिळा’* (मेख) पुरुषांनी उपटायचा असतो. परंतु गेरणी (स्त्रिया) गेरियांना (पुरुषांना) तो खिला म्हणजे लाकडाची मेख उपटू देत नाहीत, त्यांना काठीने मारतात. खेळ रंगल्यानंतर मुलाला आणि मुलाच्या आईला (याडीला) मांडवाखाली बसवून तिच्या डोक्यावर एक आडवी काठी धरण्यात येते, तिच्यावर हातातल्या छोट्या टिपऱ्यांनी वाजवत *’धुंड गीत’* सात वेळेस म्हणण्याची प्रथा बंजारा समाजात प्रचलित आहे. हे काठीवर टिपरी मारणे म्हणजे समागमाचे प्रतीक आहे, असे अनेक जाणकारांचे मत आहे. या प्रसंगी शिरा-पुरी आणि बकऱ्याचा बळी दिला जातो. निसर्ग प्रार्थना, पूर्वजांची, आदिमातेची प्रार्थना केली जाते. या वेळी तांड्याचा नायक, कारभारी, इतर सर्व लहानथोर, स्त्री-पुरुष एकत्र जमतात. पुढील संस्कार गीत म्हणतात :
’शिकचं शिकावचं, शिके राज घडावचं’, शिकं जेरी साजं पोळी, घियार पोळी, ठोकर खाती आयी होळी’.
शिक्षणामुळेच कुळीचा, पिढ्यानपिढ्यांचा उद्धार होतो. ’म्हणजेच ‘जो शिकेल, तोच शिकवू शकेल व तोच सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचू शकतो, हाच या संस्कार गीताचा भावार्थ आहे.. कुठल्या मुलाने नायकी करावी, कुणी कारभार बघावा, कुणी गुरे राखायची, कुणी व्यापार करायचा, याचे व्यवस्थापनही धुंड संस्कार गीतामध्ये व्यवस्थितरीत्या केलेले आढळते.
◆ धुंड गीत : (संस्कार)
“हो रा हो... हो रा हो...
चरिक चरिया हो रा हो...
उतरी फागण लागो चेत,
आयी होळी वाजे ठोळी,
लावो खलपता खोदो खाड,
ओमं बोई चंपा डाल,
चरिक चरिया चंपा डाल,
जू जू चंपा लेरा ल,
तू तू पुत घडोला,
आतरा वोरे काका दादा,
आतरा वोरे मामा फुपा,
आतरा वोरे भाई बंद,
आतरा वोरे कुटुंम कबिला
चरिक चरिया हो रा हो...
पेलो बेटा नायकी करं
दुसरो बेटा कारभार करं
तिसरो बेटा खाडू चरावं
चवथो बेटा घोडो डुकावं
पाचमो बेटा पंच हतियार
छोमो बेटा सेरो वचार
लाडी लाडा घरपत वाडा
सण भरतार,
आसी आसी जणीयं सपुती नार,
जलमेर फागण उठये लाडी,
चरिक चरिया हो रा हो...
पलंगेपरिया लेन वतावं,
(पलंगे परिया चाबे पान)
गणवतेन गण सिकावं,
(गणपतणेनं गणपत आवं)
अन गदडीया रात गमावं,
पिढी घडावं नेमेनुसार,
नायेक नसाबी किदे वचार,
ये छोरारो हुओ तेवार,
सिकचं सिकावचं,
सिके हात घडावचं,
सिकं जेरी साजं पोळी,
वजी घियास पोळी,
ठोकर खाती आयी होळी,
गोरूरो बेटा आवडा हुयो रे
आवडा हुयो...
◆ प्रा. डॉ. सुभाष राठोड, पुणे
टिप्पण्या