युगप्रवर्तक : डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील - डॉ. सुभाष राठोड
शैक्षणिक क्रांतीचे युगप्रवर्तक : कर्मवीर भाऊराव पाटील
◆ प्रा. डॉ. सुभाष राठोड
थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मविभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज (22 सप्टेंबर) 137 वी जयंती. जयंतीनिमित्त त्यांच्या विचार आणि कार्याचे केलेले चिंतन.. पुरोगामी महाराष्ट्राच्या भूमीला वेगळा आणि प्रगतशील असा इतिहास आहे. महाराष्ट्र भूमीला जसा पराक्रमाचा वारसा आहे, तसा थोर महात्म्यांच्या विचारांचा, कार्याचा गंधही आहे. कोणी त्याला ‘संतांची भूमी’ म्हणून गौरवतात तर कोणी त्यास ‘सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीकारांची भूमी’ म्हणूनही ओळखतात. सुरुवातीपासूनच महाराष्ट्र राज्याला पुरोगामी विचारांचे राज्य म्हणून गौरविले गेले आहे. भले वास्तवातल्या रत्नांच्या खाणी या मातीत नसतील पण पृथ्वी मोलाची लाख नवरत्ने या मातीने जगाला दिली आहेत. कोणत्याही राष्ट्राच्या सर्वांगीण विकास कार्यासाठी विशेषतः सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिवर्तनाची आवश्यकता असते आणि त्यासाठी वैचारिक क्रांती घडावी लागते. महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनेक ख्यातनाम व्यक्तींचा समर्थ सहयोग लाभलेला आहे, ज्यांच्या निष्काम कर्मयोगामुळे शिक्षण प्रसारातून समाजजागृतीबरोबरच समाजात वैचारिक जागृती घडत गेली. अशा ध्येयवेड्या, कर्तृत्ववादी व दूरदृष्टीच्या तेज:पुंज महापुरुषांत कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अग्रक्रमाने उल्लेख केला जातो. हल्लीच्या काळात सगळे ‘शिक्षणसम्राट’ असतील पण खऱ्या अर्थाने ‘शिक्षणमहर्षी’ असणारे कर्मवीर (कृतींचा राजा) भाऊराव पाटील. ग्रामीण भागातील शिक्षणाची गरज अण्णांनी 100 वर्षांपूर्वीच ओळखली होती.
‘स्वावलंबनातून शिक्षण, विद्येचा श्रमाची जोड’ हा स्फूर्तिदायक संदेश कर्मवीरांनी महाराष्ट्राला दिला. महाराष्ट्रातील एक प्रेरणादायी शिक्षणयात्री, गोर-गरीबांचे कैवारी, स्वावलंबी शिक्षणाचे धडे देणारे, ‘कमवा आणि शिका’ योजनेचे शिल्पकार, ‘कमवा व शिका’ या योजनेच्या माध्यमातून युवकांना स्वावलंबनाचा, प्रगतीचा मार्ग दाखवणारे, शिक्षण हेच कर्म, समाजसेवा हाच धर्म मानणारे, जातिभेदाची बंधने झुगारून शिक्षणाची गंगोत्री तळागाळापर्यंत पोहोचवणारे, ग्रामीण शिक्षण चळवळीचे अध्वर्यू, स्वावलंबी शिक्षणाचे ब्रीद घेऊन शैक्षणिक क्रांती घडवून आणणारे, बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी अवघे आयुष्य वेचणारे, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीदिनी त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन..!
जवळ कुठलीही डिग्री (पदवी) नाही, पैसा नाही, अशाही अवस्थेत शून्यातून ब्रम्हांड निर्माण करून त्यांनी बहुजन समाजावर ज्ञानामृताची वृष्टी केली. स्वावलंबनातून शिक्षण, विद्येला श्रमाची जोड हा स्फूर्तिदायक संदेश त्यांनी महाराष्ट्राला दिला. उच्च वर्णीयांच्या शिक्षण मक्तेदारीच्या काळात पिढ्यान् पिढ्या अज्ञानरुपी अंध:कारात खितपत पडलेल्या बहुजन समाजाला नवी दिशा देणाऱ्या, जातीभेद तोडून टाकण्याची शिकस्त करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील वारणेच्या काठी वसलेल्या ‘कुंभोज’ या छोट्याशा गावी २२ सप्टेंबर १८८७ रोजी झाला. कर्मवीरांचे मूळ घराणे कर्नाटक राज्यातील, द्क्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडब्रिदी गावचे. देसाई हे त्यांचे आडनाव. कर्मवीरांचे पूर्वज नशीब आजमवण्यासाठी महाराष्ट्रात आले व ऐतवडे बुद्रुक जि. सांगली येथे स्थिरावले. पुढे त्यांच्या घराण्यात पाटीलकी आली. त्यामुळे त्यांचे देसाई हे आडनाव जाऊन पाटील हे आडनाव रूढ झाले. कर्मवीरांच्या वडिलांचे नाव पायगोंडा पाटील व आईचे नाव गंगाबाई होते, तर धर्मपत्नीचे नाव लक्ष्मीबाई होते. त्यांचे वडिल हे रोड कारकून म्हणून नोकरीस होते. त्यामुळे त्यांचा सातारा जिल्ह्यात नोकरीतील बदलीच्या निमित्ताने सतत प्रवास होई. रोड कारकून म्हणून त्यांच्या वडीलांचा तळागाळातील लोकांशी संबंध येत असे. त्या लोकांची गरिबी व हाल अपेष्टा पाहून बालवयातील भाऊरावंचे मन गहिवरून येई. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना पाणी भरता येत नाही हे चित्र पाहूनही त्यांना वाईट वाटे. त्यातूनच त्यांनी पुढील आयुष्यात रंजल्या-गांजलेल्या लोकांसाठी काम करण्याची प्रेरणा भेटली असावी. प्रेमाने लोक त्यांना अण्णा म्हणत तर सन्मानाने कर्मवीर म्हणत. भाऊराव पाटील यांची राहणी अत्यंत साधी होती. खादीचं साधं धोतर आणि नेहरू शर्ट असा पोशाख ते नेहमी करायचे. सुरुवातीच्या काळात खांद्यावर घोंगडी घालत. नंतर घोंगडी गेली आणि हाती काठी आली.
कर्मवीरांचे प्राथमिक शिक्षण कुंभोज, दहिवडी, विटा व पुढील विद्यालयीन शिक्षण कोल्हापूरातील राजाराम हायस्कूलमध्ये 1902 ते 1907 या काळात झाले. शाळेतील पहिल्याच दिवशी त्यांचे बाह्यरूप पाहून विद्यार्थी त्यांना हसले होते. शालेय अभ्यासक्रमात ते मागे असले तरी कुस्ती, मल्लखांब, पोहणे या क्रीडाप्रकारात पटाईत होते. ते इंग्रजी सहावी म्हणजे आताची दहावी शिकले. 10 वी नापास असणाऱ्या याच विद्यार्थाने पुढील काळात ज्ञानाची गंगा खेड्यापाड्यांपर्यंत नेली. कोल्हापुरात असताना भाऊराव कोल्हापूर येथील दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये राहत असत ही बोर्डिंग 1905 मध्ये राजर्षी शाहूंनी सुरू केली. कोल्हापूरच्या जैन बोर्डिंगमध्ये असताना त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला. त्यातून त्यांची वैचारिक जडणघडण झाली. अस्पृश्यतेविरुद्ध बंड, वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, अंधश्रद्धा, कामगारांचा छळ आणि आर्थिक विषमता या विषयांवर ते अत्यंत आक्रमकपणे बोलायचे. अन्यायाची प्रचंड चिड, खरे तेच बोलणार, सत्य तेच सांगणार हे तत्व त्यांच्यात बालपणापासून भिनलेले होते. कोल्हापुरात शिक्षण घेत असल्यापासूनच महात्मा फुले, शाहू महाराज, महात्मा गांधी यांच्यासारख्या महान समाज धुरिणांच्या विचारांचा अण्णांवर पगडा पडला होता. स्वातंत्र्य लढयात ते महात्मा गांधीच्या विचारांनी प्रेरित झाले होते. या तीन महान व्यक्तींमुळेच कर्मवीर अण्णांच्या मनात समाजसेवेचे शुद्ध बीज अंकुरित झाले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनीही ते भेटले होते. शिक्षण हाच सर्व सुधारणांचा पाया आहे अशी त्यांची खात्री पटली. शिक्षणाच्या अभावामुळेच आपली पीछेहाट झाली आहे याची त्यांना अगदी तरुण वयातच जाणीव झाली. पुढील काळात भाऊराव पाटील साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी माधवअण्णा मास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदि मंडळींच्या साथीने 1909 मध्ये वाळवे तालुक्यात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन करून यांच्या साथीने सर्व जाती-धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह सुरू केले. भाऊरावांच्या शैक्षणिक कार्यास येथूनच प्रारंभ झाला. रयत शिक्षण संस्थेचे बीज खऱ्या अर्थाने येथेच रोवले गेले. त्यांनी ओगले ग्लास फॅक्टरी आणि किर्लोस्कर कारखान्यात काही काळ नोकरी केली; परंतु नोकरीत त्यांचे मन रमले नाही. याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला. त्यांच्यावरील महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. ते जोतीराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे महत्त्वाचे सक्रिय सदस्य होते. महात्मा फुले यांना गुरू मानूनच त्यांनी आपल्या शैक्षणिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली.
‘सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील ‘काले’ या गावी 1919 मध्ये सत्यशोधक परिषदेचे अधिवेशन भरले होते. ग्रामीण जनतेच्या शिक्षणासाठी शिक्षण संस्था स्थापन करावी अशी विनंती भाऊरावांनी केली आणि ती मान्यही झाली. दीन-दलित, बहुजन मुलांना शिक्षण दिले पाहिजे असा विचार त्यांनी मांडला. सातारा जिल्ह्यातील ‘काले’ या गावी विजयादशमीच्या मुहूर्तावर दिनांक 4 ऑक्टोबर 1919 रोजी भाऊराव पाटील उर्फ अण्णा यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. शेतकरी म्हणजेच रयत. रयतेला शिक्षण देणारी संस्था म्हणूनच या संस्थेला ‘रयत शिक्षण संस्था’ असे नाव देण्यात आले. पुढे 1924 मध्ये रयत शिक्षण संस्थेचे सातारा येथे स्थलांतर झाले व सर्व जातिधर्माच्या विद्यार्थ्यांसाठी सातारा येथे एक मिश्र वसतिगृहाची स्थापना केली. ग्रामीण जनता अडाणी असल्यामुळे कर्जबाजारीपणा, अंधश्रध्दा, जुन्या चालीरिती यात अडकली होती. शिक्षणाबद्दल उदासीन होती. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आवश्यक होते. लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न होता. शिक्षणासाठी परगावी ठेवणे व त्यासाठी खर्च करणे अशक्य होते. ग्रामीण जनतेच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर अगोदर त्यांच्या राहण्या – जेवणाची सोय केली पाहिजे, हे लक्षात घेऊन कर्मवीरांनी वसतिगृहापासून कार्याची सुरूवात केली. समाजातील गरीब, अनाथ, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गरिबाघरच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी कर्मवीरांनी हे वसतिगृह सुरू केले होते. याच बोर्डिंगमध्ये राहून गरीब कुटुंबांतील लाखो विद्यार्थ्यांनी येथे शिक्षण घेतले आहे. बॅरिस्टर पी. जी. पाटील, इस्माइलसाहेब मुल्ला अशा थोर व्यक्ती याच वसतिगृहातून मोठ्या झाल्या. या वसतिगृहातील गरिबांची शेकडो मुले आज देशात उच्चपदे भूषवित आहेत.
25 फेब्रुवारी 1927 रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामकरण केले गेले. सर्व जाती धर्मातील विद्यार्थी येथे वसतिगृहात एकत्र राहतात हे पाहून गांधीजींना खूप आनंद झाला होता. “भाऊराव, साबरमती आश्रमात मला जे जमलं नाही ते तुम्ही याठिकाणी यशस्वीरित्या करून दाखवलं आहे. तुमच्या कार्यास माझे आशीर्वाद !” महात्मा गांधीजींच्या हरिजन-सेवक संघाकडून या वसतीगृहाला 1933 पासून वार्षिक 500 रुपये इतकी मदत देण्यात येत होती. 4 एप्रिल 1933 रोजी बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड हे सातारा येथे आले तेव्हा त्यांनी शाहू बोर्डिंगला भेट दिली होती. 1932 मध्ये कर्मवीरांनी “युनियन बोर्डिंग हाऊस” या नावाने वसतिगृह पुणे येथे फर्ग्युसन टेकडीच्या मागे असलेल्या वडार वस्तीजवळ झोपड्या बांधून सुरू केलं.
16 जून 1935 रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली सातार्यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले. शिक्षण हे केवळ समाजातील मूठभर लोकांना नसून ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. तसेच यासाठी शिक्षक बहुजन समाजातूनच निर्माण झाले पाहिजेत म्हणून भाऊराव पाटील प्राथमिक शिक्षकांसाठी हे अध्यापक विद्यालय काढले.
1940 मध्ये ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’ या नावाने देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल सुरू केले. त्यासाठी फलटणचे राजेसाहेब श्रीमंत मालोजीराजे निंबाळकर यांनी 10 एकर जमीन, 1 बंगला व रोख 5000 रुपये देणगी दिली होती. शाळेतील विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहणे, शाळेची स्वच्छता करणे, जमाखर्च लिहिणे, शेतीत कामे करणे ही कामे करावी लागत तेथे सर्व शिक्षण मोफत होते. ‘कमवा व शिका’ हा उपक्रम शाळेत राबवला जाई. हीच कमवा आणि शिका योजना आज भारतातील सर्व प्रमुख विद्यापीठांमध्ये सुद्धा अंमलात आणली गेली आहे. इ.स.1947 साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात छत्रपती शिवाजी कॉलेजची, तर इ.स. १९५४ साली कऱ्हाड येथे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजची स्थापना केली. महाविद्यालयाच्या स्थापनेसाठीच्या निधीची अडचण आल्यावर एका धनिक गृहस्थाने महाविद्यालयाचे शिवाजी महाराजांचे नाव बदलून, मी सांगेल त्या व्यक्तीचे नाव देण्याच्या अटीवर लागेल तेवढा निधी देण्याची तयारी दर्शवली. मात्र भाऊरावांनी त्या धनिक गृहस्थास ठणकावून सांगितले की, मी एकवेळ माझ्या बापाचे नाव बदलेन पण कॉलेजला दिलेले शिवाजी महाराजांचे नाव बदलणार नाही. शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे इ.स. 1955 मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सुरू केले.
सातारा येथे सध्या रयत शिक्षण संस्थेचे मुख्यालय असून आजमितीस 444 पेक्षा जास्त हायस्कूल, 43 महाविद्यालये, 91 वसतिगृहे, 6 अध्यापक विद्यालये, 63 प्राथमिक विद्यालये, 47 पूर्व प्राथमिक शाळा, इत्यादी असा संस्थेचा शाखात्मक विस्तार, व्याप खूप मोठा आहे. संस्थेची आज सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, अहमदनगर, नाशिक, बीड इत्यादी 14 जिल्ह्यात व दोन राज्यांत संस्थेचा शाखाविस्तार झालेला आहे. रयत शिक्षण संस्थेचे एक ग्रामीण विद्यापीठ असावे हे कर्मवीरांचे स्वप्न होते. नुकतेच २०१९ मध्ये रयत शिक्षण संस्थेचे ‘शताब्दी महोत्सवी वर्ष’ साजरे करण्यात आले. तसेच नुकतेच ‘कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ (रयत), सातारा’ हे रयत शिक्षण संस्थेचे समूह विद्यापीठाची स्थापन झाले आहे. रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असून रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी सध्या शरद पवार हे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे या पदाची जबाबदारी आहे. सद्य:स्थितीत रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून लाखो विद्यार्थी शिक्षण घेत असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाची वाटचाल सुरू आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांच्या शिक्षण व ज्ञानप्राप्तीसाठी खर्ची घातले. रयत माउली लक्ष्मीबाईंनी सुद्धा आपले सर्व जीवन वसतिगृहाच्या कामातच व्यतित केले.. त्यांनी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची पर्वा न करता समाजकार्यास वाहून घेतले. ज्यावेळी वसतिगृह चालवण्यासाठी आर्थिक अडचणी निर्माण होत, अशावेळी कर्मवीर अण्णा सौ. वहिणीकडून एखादा दागिना मागून घेत. तो विकून टाकीत व वसतीगृहाची अडचण दूर करीत. बोलता बोलता सौ. वहिणीचे १२० तोळे सोने वसतीगृहासाठी व अण्णांच्या शैक्षणिक कार्यासाठी वापरले गेले. एका प्रसंगी तर सौ. वहिनीचा सौभाग्यालंकार (मंगळसूत्र) विकावा लागला. सौ. वहिणी या असीम त्यागाचे प्रतीक ठरल्या. त्या रयतेच्या माउली झाल्या.
कर्मवीरांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान :-
अण्णांचे विद्यार्थी, शिक्षण, समाज यावर देखील अतिशय स्पष्ट व आजच्या या काळात देखील मार्गदर्शक ठरतील असे मौलिक विचार आहेत. कर्मवीरांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान मानवतावादावर आधारलेले आहे. त्यांचे शैक्षणिक विचार पुढील प्रमाणे - शिक्षण हे साध्य नसून साधन आहे. शिक्षण हा माणसाच्या जीवनाचा पाया आहे. मानवजातीच्या उत्कर्षाचे शिक्षण हे एक साधन आहे. शिक्षणातून नवचैतन्य, नवसंस्कृती, नवसमाज निर्माण झाला पाहिजे. कर्मवीर विद्यार्थ्यांना सांगत की, शिक्षण घ्या, शहाणे व्हा, पालकांचे दारिद्र्य आपल्या शिक्षणाच्या आड येऊ देऊ नका, घाम गाळून शिका, समाजाच्या उपयोगासाठी शिका. शिक्षण संस्थेतून बाहेर पडणारे विद्यार्थी सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न व जबाबदार नागरिक बनले पाहिजे असा त्यांचा अट्टाहास होता. प्रभावी शिक्षण हे बलशाली राष्ट्र निर्माण करु शकते म्हणून शिक्षण हे सुलभतेने गरीब विद्यार्थ्यांना देणे ही फार मोठी राष्ट्रीय गरज आहे. शिक्षक हा खेड्यांचा आदर्श ग्रामसेवक आणि प्रभावी ग्रामनायक असला पाहिजे. विद्यामंदिरे व शिक्षण संस्था ही पोट भरण्याची साधने न होता ती विचारांची व विकासाची उगमस्थाने झाली पाहिजेत. शाळेविना एकही खेडं असू नये, प्रशिक्षित शिक्षकाविना एकही शाळा असू नये, असा विचार ते करत. विद्यार्थी हा ज्ञानाची अभिलाषा धरणारा, स्वावलंबी असला पाहिजे. विद्यार्थ्यांने चारित्र्यसंपन्न, सद्गुणी, निर्व्यसनी असावे. त्यांच्या मनात बंधुभाव असला पाहिजे. विद्यार्थ्याने जात, गोत, धर्म, पंथ असा भेदभाव मानता कामा नये. विद्यार्थ्यांनी पहाटे झोपू नये. या वेळेत तुम्ही झोपलात तर तुमचे नशीबही कायमचे झोपेल असे ते म्हणत असत. विद्यार्थ्यांबद्दल अण्णा नेहेमी म्हणत की, रयतेचा विद्यार्थी हा शिस्त प्रिय असला पाहिजे, पाण्याचा धबधबा आणि आग यावर जर नियंत्रण मिळवता आलं नाही तर त्याचा आपण उपयोग करू शकत नाही. तसेच विद्यार्थीदशेत जर विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त नसेल त्याच्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी परिणामकारकपणे होणार नाही. त्यांच्या मते, विद्यार्थी दशेत जर विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त बाणली गेली नाही तर त्यांच्या शिक्षणावर केलेला खर्च केलेला पैसा व वेळ व्यर्थ झाला असे समजावा. रयतेचा विद्यार्थी हा "मोडेन पण वाकणार नाही" ह्या ब्रीदवाक्याप्रमाणे असावा. या तत्त्वांतून असे दिसून येते की, कर्मवीरांचा नवा सुसंस्कृत मानव घडविण्याचा प्रयत्न होता.
जिद्द, कष्ट करण्याची वृत्ती, स्वाभिमान अशा अण्णांच्या अंगीभूत गुणांमुळेच उभ्या महाराष्ट्रभर रयत शिक्षण संस्था ज्ञानदानचे कार्य करू लागली. आजही तो ज्ञानयज्ञ अविरतपणे अखंड तेवत आहे. कर्मवीरांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी, स्वावलंबन आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली. ज्याच्या हाताला घट्टा व चट्टा नाही तो स्वावलंबी विद्यार्थी नाही” असे भाऊराव म्हणत असत. शिक्षणामध्ये शारीरिक श्रमाची प्रतिष्ठा प्रस्थापित करण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच काम केलं पाहिजे व त्यातून शिक्षणाचा खर्च भागवला पाहिजे असे ते म्हणत असत. स्वतः 10 वी नापास असलेल्या कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेच्या रुपाने लावलेल्या रोपट्याचे आज हजारो शाळा - महाविद्यालये असलेल्या वटवृक्षात रुपांतर झाले आहे. श्रम, स्वावलंबन व समता या तीन तत्वांवर त्यांच्या शैक्षणिक कार्याचा वटवृक्ष आधारलेला होता. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे महाराष्ट्रातील रवींद्रनाथ टागोर होत.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानामुळे त्यांना वेळोवेळी विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. अशा लोकोत्तर युगपुरुषाचा कार्य सन्मान म्हणून भारत सरकारने त्यांना 20 जानेवारी 1959 रोजी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. त्यांनतर 4 एप्रिल 1959 रोजी पुणे विद्यापीठाने त्यांच्या कार्याचे व्यापक स्वरूप पाहून मानद डी.लिट. ही पदवी बहाल केली. 6 मे,1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील गावक-यांकडून सत्कार एक लाख रू. देणगी प्रदान. आपल्या महान कार्यामुळे जनतेकडून त्यांना कर्मवीर ही उपाधी आधीच मिळालेली होती. यानंतर 9 मे 1959 रोजी एका अल्पशा आजाराने अण्णा इहलोकी गेले. एक निरंतर कर्मयोगी देहाने जरी ह्या भुमीतून अंतर्धान पावले पण विचाराने मात्र पिढ्यांपिढ्या अमर झाले आहेत. एक क्रांतीसूर्य अस्ताला गेला पण त्यापूर्वी या महाराष्ट्राच्या भूमीला ज्ञानसाधनेने प्रकाशित करून गेला. शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या, स्वातंत्र्य चळवळीसाठी हजारो कार्यकर्ते निर्माण करणाऱ्या, आधुनिक महाराष्ट्राचा भगीरथ, महाराष्ट्राच्या समाजपरिवर्तन चळवळीचा हा ज्ञानदूत, महान कर्मयोगी ९ मे १९५९ रोजी अनंतात विलीन झाला. त्यांच्या पावन स्मृतींना त्रिवार वंदन !
प्रा. डॉ. सुभाष राठोड
(रयत सेवक) पुणे, रयत शिक्षण संस्थेचे, वसंतराव सखाराम सणस ज्युनिअर कॉलेज, वडगाव खूर्द, पुणे – ४१
टिप्पण्या