..अशी बहरत गेली मायमराठी ! - डॉ. सुभाष राठोड

..अशी बहरत गेली मायमराठी !
  © डॉ. सुभाष राठोड, पुणे 
मराठी भाषा गौरव दिन विशेष...

 राजभाषा मराठीचा सन्मान म्हणून दरवर्षी 27 फेब्रुवारी ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. कवी, नाटककार, कादंबरीकार मराठी साहित्याचा मानदंड विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज त्यांना 1987 साली त्यांच्या एकूण किती कामगिरीचा गौरव म्हणून त्यांना 23 व्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून जाहीर केला. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा लेख प्रपंच..

   इ. स. 11 व्या शतकाच्या आधीच शिलालेख आणि ताम्रपटांमधून मराठीची प्राचीन रूपे बहरू लागली. संतांचे अभंग, कीर्तने, भारुडे, शाहिरांचे पोवाडे, बखरी, लावणी, फटका इत्यादींनी ती सजत गेली. ‘अमृतातेही पैजा जिंकणारी’ श्रीमंत व प्रभावी असा पंधराशे वर्षांहूनही अधिक वर्षाचा जिता-जागता इतिहास आहे. मराठीतील आद्य शिलालेख म्हणजे अक्षीचा शिलालेख. हा शिलालेख शके 934 म्हणजे‌ इ. स. 1022 मधील शिलाहार वंशीय राजा केसी देवराय यांचा पंतप्रधान भूईर्जू सेणुई त्यांच्या काळात कोरला गेला. रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळ अक्षी हे गाव असून साक्षीच्या शिलालेखात देवीकरीता नऊ कुवली धान्य अर्पण न केल्याचा उल्लेख आढळून येतो.

  इ.स. 1250 नंतर देवगिरीच्या यादव राजांच्या काळात मराठीला राज भाषेचा दर्जा मिळाला. आणि याच काळात महानुभाव पंथियांच्या विविध ग्रंथरूपाने मराठीच्या दालनात साहित्याची मांदियाळी सुरू झाली. महानुभाव पंथीय म्हाइंभट हे मराठीतील आद्य ग्रंथकार व आद्य चरित्रकारही, त्यांनी ‘लीळाचरित्र’ या ग्रंथात श्री चक्रधर स्वामींच्या अनेक आठवणी व रोजच्या घटना-प्रसंगांचा रोचक भाषेत आढावा घेतलेला आहे. ‘विवेकसिंधु’ हा आद्यकवी मुकुंदराज यांचा काव्यग्रंथ मराठी भाषेतील आद्य काव्यग्रंथ समजला जातो. विवेकसिंधू हा ग्रंथ इ.स.११८८ मध्ये रचिला गेला.

 ‘धवळे’ या नावाची प्रसिद्ध रचना करणारी महदंबा अर्थात महादाईसा ही आद्य कवयित्री याच काळातील. महाराष्ट्र ही संतांची भूमी. महाराष्ट्राचे भूषण असलेल्या संत परंपरेचा विठ्ठल नामाचा गजर करीत समाजातील विषमता, भेदभाव नष्ट करून आध्यात्मिक लोकशाही स्थापन्याचे हे सामाजिक कार्य केले. संत ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकाराम आदी संत मंडळींनी विविध प्रकारची रूपके वापरून मराठीत सरस अशी अभंग, ओव्या, भारुडे, गवळणी इत्यादी रचना केली. वेगवेगळ्या जातीतल्या संतांनीही मराठीमध्ये उत्तम अशी साहित्यरचना केली. संत नामदेव शिंपी, गोरा कुंभार, नरहरी सोनार, सावता माळी, चोखामेळा, सेना न्हावी तसेच कान्होपात्रा, त्यांच्यासह जनाबाई, मुक्ताबाईसारख्या स्त्री – संतांनी देखील अध्यात्मिक, भक्तीपर रचना केली..

    स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठी भाषेला राज मान्यतेबरोबरच संतांच्या वांड्.मयीन कार्यामुळे लोकमान्यताही मिळायला लागली. स्वराज्य स्थापनेपासून ते पेशव्यांच्या कारकिर्दीपर्यंत अनेक शाहीर पंडित कवींनी मराठी भाषेची मनोभावे सेवा केली. रामजोशी, प्रभाकर, सगनभाऊ, होनाजी बाळा, अनंत फंदी इत्यादी शाहिरांची वाणी मराठी साहित्य दरबारात ठसकेबाज शब्दांमुळे प्रेरणादायी वर्णन करू लागली. वीररसांबरोबरच श्रृंगाररसाने ओतप्रोत सजलेल्या लावण्या लिहून शाहिर फंड गाजवू लागले. मराठी शाहिरांच्या काळात आणखी एक वाड्.मयप्रकार मराठीत बहारास आला तो म्हणजे बखर वाड्.मय होय. ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे यांविषयीचे लेखन बखरीत वाचायला मिळते. बखर वाड्.मय विशेषत्वाने इ.स. 1760 ते 1850 दरम्यान बहरलेला दिसतो. या कालखंडापासून संपूर्ण भारत आणि महाराष्ट्रातही परिवर्तनाचे वारे वाहू लागले.

   मुख्य म्हणजे याआधी इ.स.1556 मध्ये भारतात मुद्रणकला आलेली होती. महाराष्ट्रात मुद्रण कलेची सुरुवात इ. स.1812 मध्ये झाली. छपाई तंत्रज्ञानाच्या शोधामुळे प्रबोधनाच्या युगाचा प्रारंभ झाला. यामुळे ज्ञानाचा प्रसार जलद गतीने होण्यास मोठी मदत झाली. याचा साहित्य व भाषेवरही दूरगामी परिणाम व्हायला लागले. इंग्रजी भाषेच्या परिचयामुळे वैचारिक निबंध वृत्तपत्रीय लेखनाला दमदार सुरुवात झाली. मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ या नावाने बाळशास्त्री जांभेकर यांनी इ.स. 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले. त्यांच्या पुढील काळात टिळक – आगरकरांचं परखड वृत्तपत्रीय लेखन सुरू झाले. या काळात मराठी भाषा ही ज्ञानभाषा म्हणून संपन्न होऊ लागली. याच सुमारास पाठ्यपुस्तके लिहिण्यास सुरुवात झाली. विविध ज्ञानशाखांच्या आधारे अनेक लेख व ग्रंथ प्रकाशित होऊ लागले. मराठी सारस्वतातील या काळातील देणगी म्हणजे ‘कादंबरी’ हा साहित्यप्रकार होय. बाबा पदमनजी यांनी इ.स. 1857 मध्ये ‘यमुना पर्यटन’ ही मराठी साहित्यातील पहिली सामाजिक कादंबरी होय. याच सुमारास हरिनारायण आपटे युगाचा प्रारंभ झाला. ‘पण लक्षात कोण घेतो ?’ ही आपट्यांची गाजलेली कादंबरी होय.

 भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात आणखी एका साहित्य प्रकाराने मराठी साहित्याला भुरळ घातली ती म्हणजे संगीत रंगभूमी होय. ‘संगीत सौभद्र’ – अण्णासाहेब किर्लोस्कर, कृ. प्र. खाडिलकर यांचे ‘संगीत मानापमान’ संगीत शारदा, गो. ब. देवलकर यांचे संशयकल्लोळ यासारख्या संगीत नाटकांमुळे मराठी रंगभूमी उत्तरोत्तर बहरतच राहीली. पौराणिक कथांचा आधार घेत ही नाटके लोकप्रबोधन व लोकमनोरंजन करायला लागली.

   इंग्रजी भाषा शिकून इंग्रजीतील साहित्याने प्रभावित झालेल्या पहिल्या पिढीतील कवींनी भावगीतात्मक, प्रणयप्रधान व सामाजिक विचार असणाऱ्या कवितांच्या मुक्ताविस्काराला सुरुवात केली. कवी केशवसुत हे त्यापैकीच एक होय. ‘तुतारी’, ‘नवा शिपाई’ यांसारख्या त्यांच्या कवितांतून नव्या युगाची तुतारी फुंकली.

  इ.स. 1945 हे साल अर्वाचीन साहित्याचं “क्रांतिपर्व’ म्हणून ओळखलं जातं. स्वातंत्र्यानंतर देशाची झालेली फाळणी, बेकारी, महागाई, अराजकता इत्यादींचा आविष्कार नवकाव्याचे जनक बा. सी. मर्ढेकर यांनी “पिपात मेले ओल्या उंदिर’, “बडवीत टिपऱ्या’ यासारख्या कवितांतून केला. स्वातंत्र्योत्तर कालखंडात दलित, ग्रामीण समाजाच्या दुःखाचे हुंकार मराठी साहित्याच्या दालनात पुढे पुढे अधिक गडद होत गेले. परंतु, आज इंग्रजीच्या वाढत्या रेट्यांमुळे आणि आपली मुले मराठी माध्यमात शिकली तर मागे राहणार नाही ना? या बदत्या मानसिकतेमुळे दर्जेदार शिक्षण देणाऱ्या हजारो मराठी शाळा बंद पडत आहेत. मराठी भाषेला केवळ अभिजात भाषेचा दर्जा बहाल करून हे प्रश्न सुटणार नाहीत, तर बदलत्या परिस्थितीचा विचार करून आपले भाषिक धोरण पुन्हा नव्याने ठरविण्याची गरज निर्माण झाली आहे.

 ◆ प्रा. डॉ. सुभाष राठोड, लेखक, प्राध्यापक, पुणे

मा. अभ्यास मंडळ सदस्य

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, पुणे

शिक्षण संस्थेचे, वसंतराव स. सणस ज्युनिअर कॉलेज, पुणे - ४१


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

AI क्रांती : नव्या जगाचा उदय - डॉ. सुभाष राठोड

गुरुपौर्णिमा : ज्ञानाचा आणि कृतज्ञतेचा उत्सव

युगप्रवर्तक : डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील - डॉ. सुभाष राठोड

आजच्या शिक्षणातील नवी आव्हाने - प्रा. डॉ. सुभाष राठोड

शिक्षणात मराठी : आव्हाने आणि उपाय - डॉ. सुभाष राठोड

मराठी भाषा‌ दिन : भाषा आणि संस्कृतीचा गौरव - डॉ. सुभाष राठोड

राष्ट्रभाषा हिंदी : संवादाचा सेतू - प्रा. डॉ. सुभाष राठोड, पुणे

समतेचे दीपस्तंभ : छत्रपती शाहू महाराज ● प्रा. डॉ. सुभाष राठोड, पुणे

साक्षरता : सामाजिक परिवर्तनाचे पाऊल - डॉ. सुभाष राठोड