संत सेवालाल महाराज बंजारा-लमाण तांडा समृद्धी योजना
संत सेवालाल महाराज बंजारा-लमाण तांडा समृद्धी योजना :
आजही महाराष्ट्रातील सुमारे २० ते २५ लाख बंजारा-लमाण समाजाचा अपेक्षित विकास झालेला नाही. या समाजाला विकासाच्या मूळ प्रवाहात आणून त्याचे राहणीमान उंचावणे, उत्पन्नाचे स्रोत वाढावेत आणि स्थिरता प्राप्त करून आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने संत सेवालाल महाराज बंजारा-लमाण तांडा समृद्धी योजना सुरू करण्यात आली आहे.
योजनेचा उद्देश :
राज्यातील बंजारा आणि लमाण समाजाच्या तांड्यांमध्ये मूलभूत सुविधा आणि विकासासाठी प्रोत्साहन देणे.
योजनेची वैशिष्ट्ये :
● तांड्यांना गावठाण आणि महसूल गावचा दर्जा देणे.
● स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी अंतराची अट शिथिल करणे.
● प्रत्येक तांड्याला ३० लाख रुपये पर्यंत निधी उपलब्ध करून देणे.
● पाणीपुरवठा, वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता इत्यादी सुविधांसाठी निधी.
● तांड्यांमधील तरुणांसाठी कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती कार्यक्रम.
● बंजारा आणि लमाण समाजाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन.
योजनेचा लाभ :
तांड्यातील नागरिकांना मूलभूत सुविधांचा लाभ मिळेल.
तांड्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास होईल.
बंजारा आणि लमाण समाजाचे जीवनमान उंचावेल.
योजनेची अंमलबजावणी :
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल. समिती तांड्यांची निवड आणि निधी वाटप करेल.
योजनेसाठी निधी :
योजनेसाठी ५०० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
योजनेचा शुभारंभ:
योजनेचा शुभारंभ ०५ फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या योजनेतून बंजारा - लमाण तांड्यावर स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी अंतराची अट शिथिल करण्यात आली असून या योजनेतून प्रत्येक तांड्याला ३० लाखांपर्यत विकासकामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. बंजारा - लमाण तांड्याच्या विकासासाठी उचललेले हे पाऊल असून भविष्यात राज्यातील तांड्यांचे कायापालट होऊ शकते.
बंजारा, लमाण समाज (गोर-बंजारा / गोरमाटी समाज) आजही विखुरलेल्या स्वरूपात रुढी परंपरेनुसार तांडा निर्माण करून मुख्य गावापासून दूर विशेषतः दुर्गम / डोंगराळ भागामध्ये वास्तव्य करून राहतो. उदरनिर्वाहासाठी सततच्या भटकंतीमुळे शिक्षण, आरोग्य व इतर मूलभूत सुविधेपासून सदर समाज वर्षानुवर्षे वंचित राहिला आहे. या बंजारा - लमाण तांड्यांना अजूनही गावठाणचा अन् महसुली गावाचा दर्जा दिलेला नसल्याने 'विकास' हा शब्द आजही त्यांच्यापासून कोसो दूर आहे. त्यामुळे तांड्याला गावाचा दर्जा देऊन ग्रामपंचायत स्थापन करणे, पाणी, वीज, शाळा, अंगणवाड्या, आरोग्य, पथदिवे, गटार, अंतर्गत रस्ते या मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी या योजनेचा नक्कीच लाभ होईल.
सन २००४ मधील शासनाच्या निर्णयात बदल करून तांड्यासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन गावातील ३ किलोमीटर अंतराची अट रद्द केली आहे. तांड्यांची लोकसंख्या १००० पेक्षा कमी असली तरी एकापेक्षा जास्त तांडे एकत्रित करून गट ग्रामपंचायत स्थापन करण्यास तसेच १००० पेक्षा जास्त लोकसंख्या असल्यावर आजुबाजुचे छोटे तांडे असले तरीही गट ग्रामपंचायत स्थापन होऊ शकणार आहे.
अधिक माहितीसाठी :
ग्राम विकास विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या . आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा ग्राम विकास अधिकाऱ्याशी संपर्क साधा.
टीप : ही योजना अजूनही प्रारंभिक टप्प्यात आहे.
योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही बदल होऊ शकतात.
ग्रामविकास व पंचायतराज विभागाचा पत्ता
ग्रामविकास व पंचायतराज विभाग
७ वा मजला,बांधकाम भवन, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई-४००००१
022 22060446
टिप्पण्या